Pages

Monday, 2 March 2020

*बबड्या*

एखाद्या कुटुंबातल्या मुलाचा *बबड्या* कसा होतो? हा खरोखरच आवर्जून वेळ काढून अभ्यासण्यासारखा विषय आहे. वयाची विशी उलटून गेलेल्या आपल्या बबडूच्या अंथरूणाची घडी घालणं, बेडवरची विस्कटलेली बेडशीट व्यवस्थित घालणं, बबडूचे कपडे धुवायला टाकणं, त्याच्या खोलीतलं टाॅयलेट स्वच्छ करणं, चहा-काॅफी-दूध-नाश्ता सगळं सगळं अगदी हातात आणून देणं, बबडूला डबा देणं, रोज संध्याकाळी त्याच्या सॅकमधून तो डबा काढून धुवून ठेवणं, बुटात तसेच राहीलेले किंवा इतरत्र पडलेले पायमोजे शोधून धुवायला टाकणं इत्यादी कामं रोजच्या रोज अगदी नियमितपणे करणाऱ्या आया मी पाहिल्या आहेत. माझ्या पाहण्यात अशी कित्येक घरं आहेत जिथं केवळ मुलाला अमुक भाजी आवडत नाही म्हणून दुसरी केली जाते. सकाळी झोपेतून उठवून टूथब्रशवर पेस्ट लावून हातात देणाऱ्या सुद्धा आया आहेत. या घरातल्या बबड्यांना साधं शर्टाचं तुटलेलं बटणसुद्धा सुईदोरा घेऊन शिवता येत नाही, इस्त्री करता येत नाही, भाज्या निवडतां येत नाहीत, दळणाचा डबा घेऊन पिठाच्या गिरणीत जाणं त्यांना कमीपणाचं वाटतं, घरातला संडास धुणं कमीपणाचं वाटतं. मंडईतून घेवडा आण असं म्हटलं की बबडू फरसबी घेऊन येतो. फळं आणायला सांगितलं तर त्याला ती निवडून घेता येत नाहीत. कारण बबडूला कुणी कधी कामच सांगितलेलं नाही. लाडोबाला कधी कुणी कामाला लावतात का?

शाळेचा अभ्यास, एखादी कला किंवा एखादा खेळ यांपैकी कशाततरी बबडू आघाडीवर असेल, पण तेही नाही. बबडूच्या मनाप्रमाणे सगळं घर चालतं. त्यामुळं एखादी गोष्ट मागण्याकरिता आपणही काहीतरी मिळवून दाखवावं अशी त्याची मानसिकताच नाही. आईनं सगळं करायचं हीच पक्की धारणा. ही अशी धारणा व्हायला कारणीभूत कोण? तर आईच....!

आया हतबल का बरं होतात? त्या मुलांपुढं शरणागती का पत्करतात? मुलं म्हणतील ते, म्हणतील तसं आणि म्हणतील तेव्हा केलंच पाहिजे असं कुठलं बंधन आयांवर असतं? आपण मुलांच्या मनासारखं वागलो नाही तर जणू काही आभाळच कोसळेल असं आयांना का वाटतं? ह्या सगळ्या प्रश्नांची उकल योग्य प्रकारे झाली पाहिजे.

‘आई, तू मॅड आहेस’ असं चारचौघात आईला म्हणणारी मुलगी मी पाहिली आहे. ‘ओ बाबा, आपल्याला ज्यातलं कळत नाही ना, त्यात पचकू नये’ असं वडिलांना म्हणणारी मुलं मी पाहिली आहेत. “हे माझं पर्सनल लाईफ आहे, मी काहीही करेन. इट्स नन आॅफ युअर बिझनेस” असं पालकांना पदोपदी ऐकवणारी पोरं मी पाहतो. मला त्या मुलांपेक्षाही त्यांच्या पालकांविषयीच जास्त वाईट वाटतं.

अनेकदा या सगळ्या कौटुंबिक प्रश्नांमध्ये घरात वडीलधारी माणसं नाहीत म्हणूनच या समस्या निर्माण होतात असा निष्कर्ष काढला जातो. पण आजकाल अनेक घरांमध्ये वडीलधाऱ्या माणसांकडूनही नातवंडांविषयी अपेक्षा करता येणं कठीण होत चाललंय. कारण त्यांनाही स्वातंत्र्य हवंय, मनसोक्त जगायला हवंय. मुलांच्या अभ्यासाच्या वेळीच त्यांच्या आवडत्या सीरियल्स लागतात, त्यांना त्या पहायच्याच असतात. एकही एपिसोड चुकवायचा नसतो. तीन-चार खोल्यांच्या घरात दुसरीकडे बसून अभ्यास करायचा म्हटलं तरी त्या टीव्हीचा आवाज येतोच. बरं, जे ऐकू येतं ते ऐकण्यासारखं नसतंच. मग शाळेचा अभ्यास व्हावा तरी कसा? आणि घराघरातला बबडू एक उत्तम माणूस म्हणून घडावा तरी कसा?

या सगळ्या गोंधळात एक मोठा आणि महत्वाचा प्रश्न अनुत्तरितच राहतो, तो म्हणजे - मुलांना बबडू होण्यापासून वाचवण्याची जबाबदारी कुणाची? खरं सांगायचं तर, काही वर्षांपूर्वी हा प्रश्नच मुळात विसंगत होता. कारण तेव्हा ‘आपला तो कारटा आणि दुसऱ्याचा तो बाब्या’ असाच कुटुंबांमधला नियम होता. भाचा किंवा पुतण्याची पूजा घातली  की आपल्याही पोराची मंत्रपुष्पांजली म्हणायची रितच होती. शिक्षेच्या बाबतीत समानतेचा कायदा कुटुंबांमध्ये संमत होता.

आजकाल आपल्या मुलांच्या बाबतीत सगळ्याच भूमिका आईवडीलांनाच कराव्या लागतात. पण काही वर्षांपूर्वी तसं नव्हतं. मोठे काका, मोठी काकू, मधला काका, मधली काकू, धाकटा काका, धाकटी काकू यांच्यामध्ये दंड किंवा शिक्षा मंत्रालय, न्यायालय, गृहपाठ विभाग, परवचा विभाग, व्यायाम विभाग, घरकाम विभाग, स्वच्छता विभाग, हट्ट किंवा लाड पुरवणे विभाग यांची वाटणी झालेली होती. जो विभाग ज्याच्याकडे असेल त्याचे सर्वाधिकार त्याच व्यक्तीकडे असत. दुसऱ्या कुणीही मध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा रदबदली करण्याचा प्रश्नच नव्हता. उदाहरणार्थ, धाकटी काकू परवचा म्हणवून घेत असेल आणि एखाद्या दिवशी उच्चार चुकले म्हणून तिने दोन छड्या मारल्या तर कुणीही मधे पडत नसत. संध्याकाळी घरी यायला सात पेक्षा उशीर होणार असेल तर वडील सरळ ‘मोठ्या काकांना विचारून काय ते ठरव’ असं सांगत. काहीतरी कमवून दाखवल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळतच नसे. आठवडाभर रोज काकांची सायकल स्वच्छ पुसली तरच शनिवारी किंवा रविवारी चार-पाच चकरा मारायला मिळत. संपूर्ण गृहपाठ झाला असेल तरच रविवारचा दुपारचा मराठी सिनेमा पहायला मिळण्याची शक्यता असायची. कारण, इतकं सगळं करूनही सिनेमाचा विषय बामविप (बाल मनावर विपरित परिणाम) करणारा असेल तर तो सिनेमा पाहण्याचा विषयच बंद व्हायचा. मोठी माणसंसुद्धा तो सिनेमा बघत नसत. थोडक्यात काय तर, ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ अशा पद्धतीनं कुठल्याही मुलानं घरात वागण्याची प्राज्ञाच नव्हती.

आई, वडील किंवा एकूणच वडीलधाऱ्यांशी वागण्याच्या शिष्टाचारांच्या चौकटी अत्यंत कठोर आणि भक्कम होत्या. त्या चौकटी मोडणाऱ्याला त्याची जबर किंमत मोजावी लागायची. आता हे सगळं इतिहासजमा करण्यात आलं आहे. का करण्यात आलं? कारण एकच आहे, पालकांना त्यांची मुलं प्रसिद्ध आणि यशस्वी व्हायला हवी आहेत, तीही कुणीही वेळ न देता. मग अशा परिस्थितीत घराघरांमध्ये बबडू नाही तर काय श्रावणबाळ निपजणार आहे का?

मुलं टोकाची आत्मकेंद्रित, टोकाची स्वार्थी आणि टोकाची अप्पलपोटी होण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढतंय, हे पालकांच्या लक्षात येतंय का? शिक्षकांच्या लक्षात येतंय का? विविध तज्ञांच्या लक्षात येतंय का? ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात येतंय का? माझ्या मते, हे सगळ्यांच्याच लक्षात येतंय. पण सगळ्यांनीच ह्या प्रश्नाचा फुटबाॅल केला आहे आणि हा प्रश्न एकमेकांकडे टोलवण्याकडेच सगळ्यांचा कल दिसतो.
आईवडीलांनी स्वत:ची आयुष्यं नको इतकी व्यस्त करून घेतली आहेत. कौटुंबिक आयुष्यातली त्यांची मानसिक, भावनिक गुंतवणूकच कमी आहे. व्यक्तिगत इच्छा, आकांक्षा, ध्येयं यांच्या पूर्ततेसाठीच त्यांना वेळ पुरत नाही, तर मग मुलांसाठी वेळ कुठून आणायचा? मूल गर्भात वाढत असतं तेव्हा प्रोफेशनल क्लासेस लावून गर्भसंस्कार करायचे आणि नंतर मात्र त्याला वेळच द्यायचा नाही, हे दुर्दैवानं अनेक कुटुंबांमध्ये घडताना दिसतं.

मेणाहून मऊ होणाऱ्यानं वज्राहूनही कठोर होण्याची क्षमता स्वत:मध्ये वेळीच विकसित केली पाहिजे, हेच या प्रश्नावरचं सगळ्यात प्रभावी उत्तर आहे. बोटभर उसवलेलं असेल तर टाका घालता येतो, पण हातभर फाटलं असेल तर? “इतकं होईपर्यंत तुम्ही काय करत होतात?” हा प्रश्न येणारच... पालकमित्रांनो, स्वत:ला वेळीच बदला किंवा या प्रश्नाचं समोरच्याला पटेल असं विश्वासार्ह उत्तर चांगलं तोंडपाठ करून ठेवा...!

©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.